पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता पुण्यात होणार्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या देशव्यापी अभियानाचा चौथा टप्पा पुण्यात पार पडत असून, या कार्यक्रमात राहुल गांधी प्रामुख्याने विद्यार्थिनी आणि तरुणींशी थेट संवाद साधणार आहेत. शिक्षण , वाढती बेरोजगारी आणि महिला सुरक्षा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते सविस्तर चर्चा करणार आहेत.
पुण्यातील आरटीओ जवळील एआयएसएसएमएस शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी तब्बल ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याने कार्यक्रमस्थळी प्रचंड गर्दी होण्याचा अंदाज आहे. ही गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विचारात घेऊन पुणे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कसा असेल पोलिसांचा बंदोबस्त?
कार्यक्रमादरम्यान सुरक्षितता राखण्यासाठी आणि गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी पोलिसांचे दोन टप्प्यांत विशेष नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी सुमारे ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचा कडक बंदोबस्त असेल. मुख्य प्रवेशद्वार, वाहनतळ, प्रमुख चौक आणि संपूर्ण परिसरावर पोलीस यंत्रणा बारीक लक्ष ठेवून असणार आहे. तसेच प्रवेश करणार्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे.
कार्यक्रमामुळे परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तब्बल ७०० वाहतूक पोलिसांचा ताफा स्वतंत्रपणे तैनात करण्यात आला आहे. वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे. गर्दी प्रचंड वाढल्यास वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग वापरण्याचे नियोजनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशाल जनसमुदाय आणि विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता, काँग्रेस पक्षाकडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असून संपूर्ण परिसराला छावणीचे रूप आले आहे.
लाईव्ह कॉन्सर्ट अन् राहुल गांधींचा थेट संवाद
या कार्यक्रमाचे स्वरूप अत्यंत भव्य आणि युवावर्गाला आकर्षित करणारे ठेवण्यात आले आहे. सध्या स्टेजवर साऊंड टेस्टिंग आणि बँड सेटिंगचे काम वेगाने सुरू आहे. सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. सुरुवातीला बॉलीवूड प्लेबॅक सिंगर असिस कौर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट रंगणार आहे. त्यानंतर हिपहॉप आर्टिस्ट सायना यांचा परफॉर्मन्स आणि टीम डान्सेक्सच्या कलाकारांचे खास सादरीकरण होईल.
सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर ठीक ६ वाजता राहुल गांधींचे भाषण सुरू होईल. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे व्यासपीठावर राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त एकही नेता उपस्थित असणार नाही. भाषणानंतर राहुल गांधी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत थेट प्रश्नोत्तरे करून त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात राहुल गांधी विद्यार्थ्यांशी काय संवाद साधणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.